आतापर्यंत 3 लाख 26 हजार 168 शेतकऱ्यांचे अर्ज
| रायगड | प्रतिनिधी |
रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, 28 नोव्हेंबरपर्यंत केवळ 3 लाख 26 हजार 168 शेतकऱ्यांनी 2 लाख 6 हजार 995 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी सुमारे 55 लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ, कीटक किंवा रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी ‘पंतप्रधान पीक विमा’ ही योजना राबवण्यात येते. यंदा हरभरा, कांदा आणि गव्हासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर आणि उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग यांसाठी 31 मार्च 2026 अंतिम मुदत आहे. मात्र, विम्यासाठी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद आहे.
राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकूण विमा रक्कम 820 कोटी आहे. शेवटच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांना ‘आपले सरकार’ केंद्रावर योजनेसाठी अर्ज करता येणार असून, अर्ज प्रक्रियेतील अडचणींसाठी 14447 या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा राज्य कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
सर्वाधिक विमा उतरवणारे जिल्हे
परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 50 हजार 462 शेतकऱ्यांनी 33 हजार 12 हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील 44 हजार 574, नांदेड जिल्ह्यातील 34 हजार 781 आणि लातूर जिल्ह्यातील 32 हजार 241 शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.
अर्ज आणि विमासंरक्षित जमीन
| विभाग | अर्जांची संख्या | विमासंरक्षित जमीन (हेक्टर) |
| कोकण | 68230 | 1.18 |
| नाशिक | 7,946 | 6,665 |
| पुणे | 43,027 | 26,177 |
| कोल्हापूर | 19,649 | 10,033 |
| औरंगाबाद | 79,377 | 42,447 |
| लातूर | 1,37,001 | 87,786 |
| अमरावती | 37,621 | 32,074 |
| नागपूर | 1,519 | 1,809 |
