शेतकर्‍याचं पांढरं सोनं धोक्यात

वातावरणबदलामुळे कांद्याच्या उत्पादनात घट
उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात पांढर्‍या कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकर्‍याचे ङ्गपांढरे सोनेफ अशी सफेद कांद्याला उपमा दिली जाते. परंतु, निसर्गाची अवकृपा झाली आली, आणि हक्काचे उत्पन्न देणारे हे कांद्याचे पीक धोक्यात आले. सातत्याने बदलणार्‍या वातावरणाचा कांदा पिकाला फटका बसत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अवेळी पडत असलेला पाऊस, धुके या वातावरण बदलाचा फटका अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध आणि गुणकारी पांढर्‍या कांद्यावर परिणाम झाला आहे. कांद्याची मुळं ही ओल्या जमिनीमुळे कुजू लागल्याने शेतकर्‍यांनी बनविलेले वाफे मरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहरी हवामानामुळे यंदा पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. गेली दोन वर्षे सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे पांढर्‍या कांद्याची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांनी गादी पद्धतीने त्याची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. अलिबागचा पांढरा कांदा हा सुप्रसिद्ध आहे. हा कांदा औषधी आणि गुणकारी आहे. त्यामुळे बाजारात अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला प्रचंड मागणी आहे. पांढर्‍या कांद्याला जीआय मानांकन ही मिळालेले असून यावर्षी उत्पादन वाढविण्याचा मानस कृषी विभागाचा होता. मात्र निसर्गापुढे हा मानस पूर्ण होणे कठीण झाले आहे. भात कापणी झाल्यानंतर जमीन सुकली की शेतकरी पांढर्‍या कांद्याची लागवड करतो. तालुक्यातील नेहुली, वाडगाव, सागाव, तळवली, कार्ले, खंडाळे या भागात पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. साधारण अडीच हजार हेक्टरवर पांढरा कांदा लागवड केली जाते. बदलत्या वातावरणाचा पांढरा कांदा लागवडीला फटका बसला असून रोगाचा धोका निर्माण झाला आहे.

गादी पद्धतीची लागवड सोयीची
गेल्या दोन वर्षांपासून सतत निसर्ग बदलत असल्याने अवेळी पावसाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लावलेली कांदा लागवड नष्ट होत आहे. बदलत्या वातावरणात शेतकर्‍यांनी गादी पद्धतीची लागवड करणे सोयीचे ठरणार आहे. पाऊस पडला तरी वाफे फुकट जाणार नाही. त्यामुळे कांदा मोठा होऊन उत्पादन ही जास्त मिळण्याची शक्यता आहे, असे उज्ज्वला बानखेले यांनी सांगितले.

बाणेर आणि खेड येथे शेतकर्‍यांचे कांद्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, आठ दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर उपाययोजना काय करायचे हे ठरविले जाणार आहे. मात्र शेतकर्‍यांनी नवी पद्धतही अवलंबणे ही काळाची गरज आहे. – उज्ज्वला बानखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Exit mobile version