जानेवारी अखेरीस शेतकऱ्यांना मिळणार पाणी

आंबेवाडी ते निवी कालव्याची कामे युद्धपातळीवर

| रोहा | प्रतिनिधी |

तब्बल दहा ते बारा वर्षे रखडलेला आंबेवाडी ते निवी हद्दीतील कालवा दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरलेला कालवा पूर्वपदावर यायला प्रारंभ झाला आहे. कालवा दुरुस्तीवर पाटबंधारे विभागाने आतापर्यंत करोडो रुपयांचा निधी खर्च केला. विभागातील तिसे, वाशी, लांढर, निवी, तळाघर हद्दीतील नादुरुस्त मोठे सायपन, एस्कॅप नव्याने केले. अनेक ठिकाणचे ब्रिज ( साकव ) झाले. कालव्याची लायनिंग कामे, ठिकठिकाणच्या दुरुस्तीची कामे पाहता युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे अधोरेखीत झाले.

कालवा दुरुस्तीबाबत मागील दोन तीन वर्षे कोलाड पाटबंधारे प्रशासन मुख्यतः संबंधित अधिकारी एकदम दक्ष असल्याचे दिसत आहे. गाव हद्दीतील एस्कॅप, मायनरची कामे दर्जेदार होत असल्याने परिसरातील नागरिकांत सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री रस्त्याखालील जुने पाईप बदलून नविन टाकण्यात आले. हा काम पहाटेपर्यंत चालू होता. सहा. कार्य. अभियंता श्वेता चिचुळकर, सहा. अभियंता रत्नदीप वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली कालवा निरीक्षक निलेश दिसले व टीमने हे काम पूर्ण केले.

दरम्यान, आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी, कालवा पूर्वपदावर येण्यासाठी सर्व शेतकरी, नागरिक समावेश बळीराजा फांऊडेशनच्या सातत्यपूर्ण लढ्याला अभूतपूर्ण यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसे, संभे, आंबेवाडी हद्दीतील काही महत्त्वाची कामे करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. कालव्याची सर्वच कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. निधी अधिक उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आंबेवाडी ते निवी कालव्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांतून व्यक्त झाला आहे.

रखडलेल्या कालव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आधी कालवा समन्वय समितीनंतर बळीराजा फाऊंडेशनची स्थापना करून निकराचा लढा उभा केला. विधिमंडळात विषय लावून धरल्याने राज्य शासनाने कालव्याच्या दुरुस्ती कामांकडे विशेष लक्ष दिले. खा. सुनील तटकरेंनी जातीने लक्ष घालत दुरुस्ती कामांना अधिक गती देण्याचा प्रयत्न केला. तर काम मार्गी लावण्यासाठी बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक राजेंद्र जाधव, अध्यक्ष विठ्ठल मोरे व पदाधिकारी कायम सतर्क आहेत. कामाची माहिती घेत अधिकारी, ठेकेदार यांच्यासाठी सहकार्य भूमिकेत आहेत. सहा. कार्यकारी अभियंता श्वेता चिचूलकर, सहा. अभियंता रत्नदीप वासनिक सातत्याने कामांची पाहणी करत आलेत.

कालवा दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यातील महत्त्वाची दुरुस्ती कामे जानेवारीअखेरीस पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर लगेचच साफसफाई करत पाणी सोडण्याचे प्रयोजन आहे.

-मिलिंद पवार,
कार्य. अभियंता, पाटबंधारे विभाग, कोलाड

Exit mobile version