आ.जयंत पाटील यांच्या प्रश्नावर सरकारची कबुली
| नागपूर | दिलीप जाधव |
पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे डोलवहाळ धरणातून सोडण्यात येणार्या आंबेवाड़ी ते निवीपर्यंतच्या कालव्याला तब्बल आठ ते दहा वर्षापासून पाणी सोडण्यात आले नसल्याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबाबतचा मुळ प्रश्न आ.जयंत पाटील यांनी उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले होते.
या कालव्यातून पाणी न सोडण्यात आल्याने रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या डाव्या तीरा वरील व उजव्या तीरा वरील बागायती,भाजीपाला शेती, फळ लागवडी वर विपरित होत आहे. कालव्या मध्ये त्वरित पाणी न सोडल्यास शेतकर्यांना आंदोलन करावे लागेल,असा इशारा पाटील यांनी दिला होता.
या मुळ प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे मे महिन्यात पाण्याअभावी गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते तसेच बागायती ,भाजीपाला शेती देखील पाण्याअभावी सुकत आहे .हे खरे आहे. कालवा दुरुस्ती कामे सन 2022-23 च्या देखभाल दुरुस्ती अंतर्गत यादी मध्ये मंजूर करण्यात आली असून निविदा प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर प्रगतित आहे. तसेच कालव्यातील गाळ काढण्याचे काम यांत्रिकी विभागाच्या मदतीने करण्याचे नियोजन आहे . हंगामाच्या सुरुवातीस सिंचनाचे पाणी मागणीसाठी जाहिर प्रगठन प्रसिद्धिस दिले असून सिंचनाच्या मागणी नुसार पाणी सोडण्यात येते असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
हेटवणे ही लघु पाटबंधारे योजना नसून मध्यम प्रकल्प आहे.आंबेवाड़ी ते निवी कालवा हा हेटवणे मध्यम प्रकल्पाचा भाग नसून काळ मोठा सिंचन प्रकल्पाच्या रोहा शाखा कालव्याचा भाग आहे . सदर कालवा नादुरस्त असल्या मुळे सिंचनास पाणी सोडण्यात आलेले नाही . कालव्यास पाणी सोडण्या विषयी लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ ,शेतकरी तसेच सामाजिक संस्था यांची निवदने क्षेत्रीय कार्यालयास प्राप्त झालेली आहेत,अशी माहिती देण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी जल संपदा विभागा मार्फत थेट कालवा घेण्यात येत नाही.ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते . कालव्याच्या दुरुस्ती अभावी संपूर्ण कालव्यास पाणी सोडने शक्य होत नाही . तथापि रोहा शाखा कालवा 0 ते 5 किलोमीटर पर्यंत सुस्थितित असलेल्या कालव्यास पाणी टंचाई कालावधीत माहे एप्रिल ते जून अखेर कालव्यास मागणीनुसार पाणी सोडण्यात येते,असेही नमूद करण्यात आले आहे.