। चिरनेर । प्रतिनिधी ।
सध्या रात्रंदिवस कोसळणार्या परतीच्या पावसाने चांगला जोर पकडला असून, त्याचा परिणाम खरीप हंगामाला बसत असून भात, नाचणी, आणि वरी ही पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आणि आपल्या देशातील शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे. यामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ तर कधी शेतीवर येणारी नैसर्गिक संकटे यामुळे शेती ही बेभरवशाची झाली आहे. यातच शेतीशी संबंधित घटकांचे वाढते दर पाहता शेती करावी की नाही, या कचाट्यात शेतकरी वर्ग सापडला आहे. चिरनेर भागात ठाकूर, कातकरी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर नाचणी व वरीची पीके घेत असतात. सध्या बर्याच ठिकाणच्या खलाटीत व रानमाळात भात, नाचणी, आणि वरीची पिके फुलोरा धरण्याच्या अवस्थेत आहेत. तर, काही भातपिके दाणे भरण्याच्या अवस्थेत असून काही भातपिके कापणीसाठी तयार झाली आहेत. मात्र, सतत कोसळणार्या पावसामुळे भात शेतीवरील फुलोरा गळून पडण्याची व भाताचे दाणेही पोचट राहण्याची भीती येथील शेतकर्याला आहे.
दरवर्षी परतीच्या पावसाचा तडाखा शेतीला बसत असल्याने शेतकर्यांचे फार मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी दत्तात्रेय म्हात्रे यांनी सांगितले आहे. चालू हंगामात परतीच्या पावसाचा असाच धुमाकूळ राहिला, तर तयार भातशेती भुईसपाट होण्याची शक्यता आहे. ऐन पिके हातात येण्याच्या वेळेस परतीचा पाऊस चांगलाच सक्रिय झाल्याने शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.