। अलिबाग । वार्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अलिबाग शाखेची मासिक सभा अनंत देवघरकर यांच्या निवासस्थानी 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्षस्थान शाखेच्या अध्यक्षा सुजाता प्रसाद पाटील यांनी स्वीकारले होते.
श्रुती राजे देसाई यांच्या स्वलिखित महाराष्ट्र गीताच्या विडंबन काव्याने हास्य काव्यसंमेलनाला सुरुवात झाली. यावेळी देवघरकर यांनी उपासतापास टाइमपास ही स्वलिखित कविता, डॉ. चंद्रकांत वाजे यांनी विविध साहित्यिकांच्या जीवनातील विनोद, वर्षा कुवळेकर यांनी उदासबोध या काव्यसंग्रहातील कविता, तर पूर्वा लाटकर यांनी वर्हाडी स्टाईल विनोद कविता सादर केल्या. नंदू तळकर यांनी जयवंत दळवींच्या ‘सारे प्रवासी घडीचे’ या विनोदी व्यक्तीचे रेखा वाचन केले. मीनल तवटे यांच्या कवितेने हास्याचे फवारे उडविले.
सचिन बार्वेकर यांनी ‘चकली’ कविता, निर्मला फुलगावकर यांनी त्यांची स्वरचित ‘जमाना बदल गया’ कविता, अल्केश जाधव यांनी ‘तू हात काप, मी गळा कापीन’ ही कविता सादर करून संमेलनात मज्जा आणली. सुजाता पाटील यांच्या ‘निवडणूक’ या कवितेने रंगत भरली. श्रुती राजे देसाई यांनी ‘रिस्क’ कविता तर दीपाली नेटके यांनी रत्नपारखी या कवींची ‘शेपटा’ कविता सादर केली. विलास नाईक यांनी त्यांच्या ‘एक ना धड’ या पुस्तकातील विनोदी कथेचे वाचन केले. रमेश धनावडे यांच्या ‘अंतर’ कवितेने संमेलनातील हास्याचा उच्चांक गाठला. तर, त्यांनी गायलेल्या त्यांच्या ‘बाय माझी लाराची’ यर आगरी गाण्याने सर्व उपस्थित साहित्यिकांना डोलायला लावले.
या हास्यकाव्य संमेलनाला 18 कवींनी हजेरी लावली होती. शाखेच्या उपाध्यक्षा निर्मला फुलगावकर यांनी आभार प्रदर्शन केले. आणि पसायदानानंतर हास्यकाव्य संमेलनाची सांगता करण्यात आली.