| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी परिसरात बहुतेक शेतकर्यांची कडधान्यांच्या पेरणीची कामे झाली आहे. मागील महिन्यापासून पेरणीची कामेही सुरू झाली. तेव्हापासून वातावरण कोरडे, त्यानंतर आता गुलाबी थंडीचे अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे रोप उगवून वाढ चांगली होत आहे. दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. सायंकाळी आकाशात ढग येतात, थंडीचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच काहीसा उकाडा जाणवत असल्याने शेतकर्यांची काळजी वाढू लागली आहे. तर कडधान्यांच्या पिकावर परिणाम होईल, अशी भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
परिसरातील वडगाव, आपटे, चावणे, मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामातील भातपिकानंतर दुबार जास्त करून वालाचे याशिवाय मूग, चवळी, हरभरा, मटकी आदी प्रकारच्या कडधान्याचे पीक घेत आहेत. यंदा भाताच्या हंगामानंतर अनेक शेतकर्यांनी अनुकूल वातावरण तयार झाल्याने ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यापासून कडधान्यांची पेरणी सुरू केली. त्यानंतर कोरडे वातावरण, गुलाबी थंडी अशा अनुकूल वातावरणामुळे उगवलेल्या रोपांची वाढ चांगली झाली आहे. मात्र, दोन-तीन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. खराब हवामान लवकर निवळले, तर कडधान्यांना धोका होणार नाही. मात्र, जास्त काळ हवामान खराब राहिले, तर कडधान्यांच्या पिकाला धोका होण्याची शक्यता आहे, असे कृषीमित्र सुदाम कडपे यांनी सांगितले.