हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती
| पाताळगंगा | वार्ताहर |
परतीच्या पावसाच्या भीतीने शेतकर्यांवर मोठे संकट निर्माण झाले असून, हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपासून परतीच्या पावसाने शेतकर्यांचा अंदाज चुकवला असून, वारा, पाऊस हे मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
वर्षभर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहावी आणि पाऊस पडल्याने भातशेती लावली जाते. त्यासाठी लागणारे खत, बियाणे, मजूर आदी खर्चाने शेतकर्यांची कंबर मोडून जाते. भातशेती उत्तम पिकली म्हणून शेतकरी आनंदी होतो. पण, शेवटच्या क्षणाला शेतकर्यांचे शेतीचे नुकसान ही परिस्थिती दरवर्षी आपणास पहावयास मिळते. अशा अनेक कारणांनी शेतकर्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी भातशेतीला उत्तम पीक आले असून, वरुणराजाची दृष्ट लागली की काय? या विचाराने बळीराजाला चिंतेने ग्रासले असून, परतीच्या पावसाच्या भीतीने तो चिंताग्रस्त झाला आहे.