फळपीक विमा हप्ता भरमसाठ

विमा कंपनी मालामाल, शेतकऱ्यांचे हाल

| रायगड | प्रमोद जाधव |

जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, म्हणून शासनाने आंबिया बहार फळपीक विमा योजना सुरू केली आहे. प्रति हेक्टरी 14 हजार 450 रुपये विमा हप्ता जिल्ह्यासाठी आहे. मात्र सिंधूदूर्ग जिल्हयात हा हप्ता सात हजार रुपये इतका असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रायगड जिल्हयातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर शासनाने मोठे अन्याय केल्याची प्रतिक्रीया उमटत आहे. जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमीनी गुंठावारी असून बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांची जमीनी एकरीत आहेत. शासनाच्या या जाचक नियमावलीमुळे शेतकऱ्यांचे हाल आणि विमा कंपन्या मालामाल अशी परिस्थिती दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, माणगांव, म्हसळा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते. जिल्ह्यामध्ये 17 हजार हेक्टर इतके आंब्याचे क्षेत्र असून, 13 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. जिल्ह्यात 56 हजारहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा बसत आहे. शेतकऱ्यांना फळपीक विम्यातून आर्थिक बळ मिळावे यासाठी सरकारने पुर्नरचित हवामान अधारित फळपिक विमा योजना सुरू केली आहे. अंबिया बहार ही योजना सुुरू केली. मुंबई येथील युनिव्हर्सल सम्पो जनरल इन्शुरन्स, कंपनीची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामान प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रति हेक्टरी 14 हजार 450 रुपये विम्याचा हप्ता ठरविण्यात आला आहे.

उत्पादनक्षम फळबागांसाठी विमा संरक्षण लागू राहणार आहे. यासाठी आंबा पिकाचे उत्पादन क्षम वय पाच वर्षे असणेर आवश्यक आहे. फळ पिकासाखील कमीत कमी दहा गुंठे असणे आवश्यक आहे. एक डिसेंबर ते 31 मे या कालावधीत अवकाळी पाऊस व कमी- जास्त तापमान, वेगाचा वारा आदीचा फटका बसल्यास एक लाख 70 हजार रुपये तसेच गारपिटचा फटका बसल्यास 57 हजार रुपयांची विमा संरक्षित रक्कम दिली जाणार आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, यासाठी राबविण्यत आलेली योजना चांगली असली, तरी या योजनेसाठी असणारा विमा हप्ता भरमसाठ असल्याची माहिती समोर येत आहे. हा विमा हप्ता कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

देखभाल दुरुस्तीचा खर्चही निघाला नाही
गेल्या दोन वर्षापूर्वी अवकाळी पावसामुळे सुमारे सात हजार 850आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला होता. त्यामध्ये सुमारे चार हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले होते. रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी सात हजार 456 शेतकऱ्यांनी फळ पीक विम्यासाठी नोंदणी केली होती. दिवाळीत विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. परंतु ही रक्कम तुटपुंजी असल्याने शेतकरी नाराज झाले होते. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे दोन लाखापासून तीन लाखापर्यंतचे नुकसान झाले. मात्र, त्यांना फक्त 70 हजारपासून 75 हजार रुपयांपर्यंत विम्यामार्फत भरपाई मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घोर निराशा व्यक्त केली होती. देखभाल दुरुस्तीचा खर्चदेखील यातून निघाला नसल्याचे काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
अशी करावी लागते मेहनत
झाडाच्या बाजूला असलेले गवत काढणे, सुकलेल्या फांद्या काढणे, झाडाच्या बाजूला खड्डा करून त्यावर पालापाचोळा टाकून सेंद्रीय खत तयार करणे, फवारणी करणे, आंबे काढणे, पेटीत ठेवणे, त्याची वाहतूक करणे अशा अनेक प्रकारची कामे शेतकऱ्यांना करावी लागतात. त्यामुळे साधारतः एक लाख रुपयांचा खर्च करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

कोकणातील सिंधूदूर्ग जिल्ह्यासाठी सात हजार विमा हप्ता आहे. तर रायगडसाठी 14 हजार विमा हप्ता ठेवण्यात आला आहे. हा रायगडच्या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली आहे. आगामी काळात पाचही जिल्ह्यासाठी आंबा फळपिक विमा हप्ता एकच ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचा पाठपुरावा सुरू केला आहे.

– चंद्रकांत मोकल, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ

Exit mobile version