उरण | वार्ताहर |
ई-पीक पाहणी डेमो अॅप प्रशिक्षणाबाबत उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच प्रशिक्षण तहसीलदार कार्यालय उरण येथे आयोजित करण्यात आले होते.
महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय परिपत्रकानुसार शेतकर्यांनी स्वतःच्या आपल्या शेतातील पीक पेरा भरण्याच्या कामी ई पीक पाहणी डेमो अॅपचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात उरण तालुक्यातील मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व कृषी सहाय्यक यांना ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकर्यांनी आपल्या शेतजमिनीचा पीकपेरा कसा भरावयाचा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
याकामी तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी यांची गावोगावी नेमणूक करण्यात आली आहे. तरी या योजनेचे प्रशिक्षण प्रत्येक शेतकर्यांनी घेऊन तद्नंतर दि. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामाचे पीक पेरे स्वतः नोंदवून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार उरण यांच्यामार्फत करण्यात आले.







