शिवार होणार हिरवेगार; चौलमळा येथे भातलावणीला सुरुवात

दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

| चौल | प्रतिनिधी |

पहिल्या पावसाची चाहूल लागताच बळीराजा धूळवाफेची पेरणी करतो. मृगाच्या पावसाने त्या बियाण्यांना जीव येतो, रोपे जोमाने वाढतात आणि लावणीसाठी तयार होतात. त्यानंतर सुरू होते भात लावणीची लगबग. वर्षभराच्या आशा उराशी बाळगून शेतकरी पुन्हा काळ्या मातीत उतरतो. काही दिवसांत हेच शिवार हिरवेगार होणार, या विश्वासाने अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील शेतकरी जीवन लोहार यांच्या शेतातून भात लावणीला गुरुवारी (दि. 2) सुरुवात झाली आहे.

अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथे सध्या भात लावणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी जीवन लोहार यांच्या शेतात महिला, शेतमजूर आणि कुटुंबातील सदस्य चिखलात उतरून भातलावणीच्या कामात गुंतले असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाच्या सरी, चिखलात सुरू असलेली धावपळ आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी आशा, यामुळे खरीप हंगामाची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अस्मानी संकटे ही शेतकऱ्याच्या आयुष्याचा जणू एक भागच बनली आहेत. कधी अतिवृष्टी, कधी पावसाचा खंड, तर कधी हवामान बदलाचा फटका… अशा संकटांना तो दरवर्षी सामोरा जात आहे. “निसर्गाने झोडपलं, राजाने मारलं तर दाद कुणाकडे मागायची?” अशी अवस्था अनेकदा निर्माण होते. तरीही शेतकरी खचत नाही. प्रत्येक संकटावर मात करत तो पुन्हा नव्या उमेदीने शेतात उतरतो. कारण त्याच्या कष्टावरच त्याचे घर, कुटुंब आणि वर्षभराची बेगमी अवलंबून असते.

यंदाही पावसाने हुलकावणी देत बराच लांबणीवर पडला. परंतु, उशिरा का होईना पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता पुढेही पावसाने अशीच साथ दिली, तर भाताचे पीक चांगले येईल आणि काही दिवसांत संपूर्ण शिवार हिरवेगार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी काही ना काही संकट येतंच. तरीही शेती सोडून चालत नाही. पाऊस लांबल्यामुळे काहीशी चिंता होती. पण, पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने लावणी सुरू केली आहे. आता पुढेही निसर्गाने साथ द्यावी आणि वर्षभराच्या कष्टाचं चांगलं फळ मिळावं, एवढीच अपेक्षा आहे.

जीवन लोहार,
शेतकरी
Exit mobile version