प्रमोद शिर्के यांचा कंपनी प्रशासनाला इशारा
| वावोशी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील जांभिवली ग्रामपंचायत हद्दीतील इंटेलिजेंट सप्लाय चैन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीमधील उद्योगधंद्यात स्थानिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे अन्यथा 23 जानेवारीपासून कंपनीच्या गेटसमोर कामगार व ग्रामस्थांकडून उपोषण करण्यात येईल, असा इशारा जांभिवलीचे सरपंच प्रमोद शिर्के यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे.
जांभिवली हद्दीत असलेल्या इंटेलिजेंट सप्लाय चैन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीमध्ये तीन वर्षांपासून कंपनीमध्ये काम करत असलेल्या कामगारांची पगारवाढ झाली नसून, त्यांची सतत पिळवणूक होत आहे. कामावर रुजू होताना पाच मिनीट जरी उशीर झाला, तरी कामगारांचा पगार कपात करणे, कामगार आजारी असला तरी त्याला बळजबरी कामावर बोलावणे, न आल्यास त्याला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देणे, कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरसुद्धा त्यास बळजबरीने त्याच्या मनाविरुद्ध थांबवून काम करुन घेणे, कामगारांना निकृष्ट दर्जाचा चहा-नाश्ता देणे, कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक काम देऊन त्यांना जाणूनबुजून त्रास देणे व त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक दिलेले काम पूर्ण न झाल्यास वारंवार कामावरुन घरी जाण्यास बजावणे तसेच त्यांच्याकडून राजीनामा देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, अशा विविध जाचक अटी व बंधने घालून कामगारांची पिळवणूक करणार्या ठेकेदार व कंपनी प्रशासनाविरोधात प्रमोद शिर्के यांनी आवाज उठवला असून, यापुढे ठेकेदारांचा मनमानी कारभार चालू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कामगारांची पगारवाढ तात्काळ करण्यात यावी तसेच स्थानिक ग्रामस्थांना उद्योगधंद्यांमध्ये सामील करुन घेणे आणि तसे न झाल्यास 23 जानेवारीपासून कामगार, ग्रामस्थ यांच्यासोबत गेटसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे निवेदन कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हाधिकारी, खालापूर तहसीलदार, पोलीस प्रशासन यांना देण्यात आले आहे.