माणगावात जलद रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा

हजारो नागरिकांकडून स्वाक्षरी मोहीम

। माणगाव । प्रतिनिधी ।

दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यातील स्थानिक तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, सुरतस्थित चाकरमानी प्रवाशांना कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करताना वर्षानुवर्षे अनेक गैरसोयींचा, अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या कोकणातून येणार्‍या जाणार्‍या लांब पल्ल्यांच्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना माणगाव रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने गैरसोय होत आहे. लोकल मेमो व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने 25 हजार स्वाक्षर्‍यांची मोहीम ऑफलाईन व ऑनलाईन हाती घेतली आहे.

दक्षिण रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील नागरीक, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग दररोज कामधंद्यानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल व इतर परिसरात ये-जा करत असतात. दक्षिण रायगड जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, पर्यटन, धार्मिक स्थळे तसेच औद्योगिक प्रकल्प असल्यामुळे दक्षिण रायगड जिल्ह्यात ये-जा करणार्‍या प्रवाशांना लोकल मेमो रेल्वे सुरु करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेला मुंबई, सुरत तसेच कोकणातील प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या स्वाक्षरीसाठी प्रवासी, नागरिक स्वत: हात पुढे करीत आहेत. यामुळे या लोकचळवळीला अधिक गती मिळाली आहे.
‘पनवेल-माणगाव-वीर अशी डेली विशेष लोकल मेमु’ तातडीने सुरू व्हावी या प्रमुख मागणीसाठी व रेल्वे प्रवासादरम्यानच्या समस्या दूर व्हाव्यात, याकरिता कोकण रेल्वे प्रवासी संघटना, रायगड या संघटनेच्या पुढाकाराने दक्षिण रायगड जिल्ह्यातील हजारो स्थानिक व चाकरमानी नागरिक एकवटले आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील रायगडकरांच्या मागण्यांसदर्भातील 25 हजार रायगडकरांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणांकडे देण्याचे नियोजित केले आहे. या लोकल मेमोमुळे कमी पैशात प्रवास होणार आहे.

Exit mobile version