| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी तसेच कंपनीच्या बांधकामांची कामे देण्याबाबत बीपीसीएल कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने सोमवार (दि.11) रोजी बीपीसीएल कंपनीच्या गेटवर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना कंपनीची कामे तसेच नोकरीत प्राधान्य मिळावे यासांठी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेकडून वारंवार पत्रव्यवहार केला जात होता.
बीपीसीएल कंपनीचे व्यवस्थापन दिप कंटक यांच्या समवेत सदर बाबत चर्चा झाली असता. त्यांनी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर निरज कुमार यांच्या बरोबर मिटींग करून देवू असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप ती मिटींग न होता व्यवस्थापनाकडून शेतकरी संघटनेला चर्चेसाठी टाळण्यात येत असल्याने (दि.11) मार्च पासून रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना बीपीसीएल कंपनीच्या विरोधात कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे रमेश पाटील, काशिनाथ कांबळे यांनी सांगितले आहे.







