घोटवडे पुलाच्या दुरुस्तीसाठी उपोषण

आंदोलनास पंचक्रोशीतील नागरिकांचा पाठिंबा
। पाली/बेणसे । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील घोटवडे गाव व आदिवासीवाड्यांना जोडणारा घोटावडे हा पुल सद्यस्थितीत धोकादायक व मोडकळीस आला आहे. हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून अक्षरशः अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे घोटवडे पुलाची तातडीने दुरुस्ती व्हावी व भविष्यातील संभाव्य धोका टळावा, याकरीता ऑल इंडिया पँथर सेना आक्रमक झाली असून पुलाची दुरुस्ती होईपर्यंत उपोषण करण्याचा इशारा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मंगळवारी (दि.13) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष संदेश भालेराव, आवेश भालेराव उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत मागणीची पूर्तता होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला घोटवडे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.

घोडवडे पुल हा परळी गावासह मुख्य बाजारपेठ व पाली खोपोली राज्यमार्गाला जोडणारा दुवा मानला जातो. हा पुल धोकादायक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून या पुलावरुन वाहनांना पुर्णपणे बंदी असल्याचे फलक सबंधित प्रशासनामार्फत पुलाजवळ लावण्यात आले होते. सुचना फलक गंजलेल्या अवस्थेत असून मोडून पडले आहे. त्यामुळे या धोकादायक पुलाबाबत प्रशासन किती संवेदनशील आहे याची प्रचिती येते. हे आंदोलन संविधानिक व कायदेशीर मार्गाने आहे. प्रशासनाने याची योग्य दखल घ्यावी अन्यथा हे आंदोलन अधिक व्यापक व उग्र करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. यावेळी दीपक केदार, नरेश गायकवाड, संदेश भालेराव,आवेश भालेराव, मारुती गायकवाड, अशोक गायकवाड, रोहित भालेराव, देवराम वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version