खोदकाम विरोधात उपोषण सुरु

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील तिनविरा येथील नवीन वसाहतीमधील (गणेशपट्टी पूनर्वसन) जागेत काही व्यक्ती टेकडी फोडण्याचे काम करीत असल्याचा आरोप विष्णू म्हात्रे यांनी केला आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरु केले आहे. हे खोदकाम थांबविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत खोदकाम करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधला, असता, खोदकाम गावाच्या विकासासाठी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तिनविरा जवळील गणेशपट्टी येथे पूनर्वसित नवीन वसाहत उभारण्यात आली होती. पूनर्वसन कामासाठी ही जागा देण्यात आली आहेत. या जागेत गावकऱ्यांच्या वापरासाठी व उपयोगासाठी तलाव असून गणेश व मारुती मंदिर, शाळा समाज मंदिर आहे. सर्व्हे नंबर 70/2 येथील जागेत गावातील काही व्यक्तींनी टेकडी फोडण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरु केले आहे. टेकडीची माती तलावात टाकून त्याठिकाणी भराव करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या तलावाचा वापर होण्यास अडचणी निर्माण होणार असून गुरांच्या पाणी पिण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, असा आरोप विष्णू म्हात्रे यांनी करीत हे खोदकाम थांबविण्याची मागणी उपोषणाद्वारे केली आहे.

याबाबत तिनविरा नवीन वसाहतीमधील ग्रामस्थांशी संपर्क साधला असता, 1998 पासून या जागेत राहत आहोत. पूनर्वसनाच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा उपलब्ध न झाल्याने येथील महिला व पुरुषांची प्रचंड गैरसोय होत आहे. पावसाळ्यात पाणी प्रचंड साचत असल्याने खूप हाल होत आहेत. गावाच्या विकासासाठी या जागेतील टेकडीचे खोदकाम करून श्रमदानातून काम करण्याच निर्णय घेतला. गावठाण जागा असल्याने खोदकाम करण्याची परवानगी ग्रामपंचायतीकडून घेण्यात आली. त्यांनी दिलेल्या अटी शर्तीचे पालन करीत टेकडीवरील मातीचे खोदकाम करून सपाटीकरण व रस्त्याचे काम केले जात आहे. गावाच्या बाजूला तलाव नसून तो खड्डा आहे. या खड्ड्याला तलावाचे स्वरूप देऊन सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न असून याच मार्गावरून स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता तयार केले जाणार आहे. जेणेकरून होणारी गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खोदकाम केलेल्या मातीची विक्री व अन्य गैरमार्गासाठी वापर होत नसल्याची माहिती जगन्नाथ जयराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिलांनी दिली.

Exit mobile version