नोकरी मिळण्यासाठी उपोषण

| अलिबाग | प्रतिनिधी |

कर्तव्य बजावत असताना एका अपघातामध्ये होमगार्ड जवानाचा डावा पाय निकामी होऊन त्याला कायमचे अपंगत्व आले होते. शिक्षणाप्रमाणे शासकिय सेवेत नोकरी व रोजगार मिळावा या मागणीसाठी दिव्यांग होमगार्ड लक्ष्मण आखाडे याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (दि.15) बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

लक्ष्मण आखाडे हा तरुण 2019 पासून चौक, खालापूर पथकातून होमगार्ड जवान म्हणून कार्यरत होता. 5 सप्टेंबर 2022 रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे खालापूर टोल नाका जवळ गणेश चतूर्थीनिमित्त कर्तव्य बजावत असताना, एका अपघातामध्ये पोलीस शिपाईसह तिघेजण जखमी झाले होते. यामध्ये लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांचा डावा पाय गुडघ्याखाली निकामी झाला होतो. यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले असून गेल्या दोन ते तीन वर्षापासून ते घरीच बसून उपचार घेत आहेत.

लक्ष्मण आखाडे हे अविवाहीत असून त्यांच्या कुटूंबात वयोवृध्द आई, वडील असल्यामुळे कुटूंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्याच्या व कुटूंबियाच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने कायम स्वरूप नोकरी देण्यात यावी यासाठी मागणी करीत आहेत. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून पोलीस महासंचालक, जिल्हा समादेशक यांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आखाडे यांनी केला आहे. न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. मागणीची तातडीने दखल घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Exit mobile version