जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवाशाला मदत करत असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दिलेल्या ठोकरीत गंभीर जखमी होमगार्ड लक्ष्मण विठ्ठल आखाडे (वय 30) जगण्यासाठी संघर्ष करत असून उपचारासाठी लागणार्या भरमसाठ खर्चासाठी शासनाने मदत करावी यासाठी लक्ष्मणचे वडिल विठ्ठल आखाडे यांनी सोमवार दि.10 ऑक्टोबरपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
5 सप्टेंबरला खालापूर हद्दीत रात्री दिड वाजणेचे सुमारास वणवे गावानजीक कारचा टायर फुटला होता. कारचालकाला मदतीकरता आयआरबी कंपनी, डेल्टा फोर्स, पेट्रोलिंग पथक, खालापूर पोलीस ठाणेकडील दरोडा प्रतिबंधक पथकमधील पोलीस व होमगार्ड पोहचले होते. सर्व सुरक्षा उपाय योजना करून कार सुरक्षित जागी ऊभी करून टायर बदलण्याचे काम सुरू असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने सहा जणांना धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी लक्ष्मण आखाडेचे दोन्ही पाय निकामी झाले.
अपघात होऊन एक महिना उलटला तरी अद्याप शासनाने कुठलीही मदत केली नाही. त्यांचा एक पाय कापला असून दुसरा पायही पन्नास टक्के निकामी झाला आहे. दुसरा पाय वाचविण्यासाठी पंधरा लाखांचा खर्च डॉक्टरानी सांगितल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट आले आहे. आखाडे कुटुंबासाठी हा खर्च न पेलणारा आहे. मुलासाठी विठ्ठल आखाडे यांनी आज सोमवार, 10 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे उपोषण सुरु केले आहे.
विठ्ठल आखाडे यांच्या उपोषणाला रायगड जिल्हा हर हर चांग भले धनगर समाज संस्था, जय मल्हार सेवाभावी संघ, कल्याणकर सेवाभावी संस्था रोहा, ग्रामसंवर्धन संस्था बांधणवाडी आदी संघटनानी पाठिंबा दिला आहे. यावेळी शिंग्रोबा कमीटी खोपोली बोरघाटचे अध्यक्ष बबन शेडगे, छावणी गरमलचे सरपंच बाळासाहेब आखाडे, शिंग्रोबा कमीटीचे माजी अध्यक्ष दिपक आखाडे, डिक्सळ पालीचे युवा नेते भगवान कोकरे, विठ्ठल बोडेकर, नारायण हिरवे, बारकू हिरवे आणि तुकाराम आखाडे आदी उपस्थित होते.
मुलाच्या उपचाराकरीता लागणारा सर्व खर्च शासनाने करावा. यापुढे शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे तसे लेखी स्वरूपात पत्र द्यावे. संपूर्ण महाराष्ट्रातील होमागार्डना कॅशलेस योजना लागू कराव्या.
विठ्ठल आखाडे
अपघातग्रस्त लक्ष्मणचे वडील