मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जाणाऱ्या इको कारला अपघात होऊन कार पलटी झाली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. भोगाव हद्दीत गुरुवारी (दि.10) पहाटे 3.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इको कार चालक लिंगप्पा कंटेपा पातारे (28) रा. निगडी, पुणे आपल्या ताब्यातील इको कार घेऊन मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जात होते. दरम्यान कशेडी घाटात भोगाव हद्दीत भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार पुलावरील कठड्यावर आदळून पलटी झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.

या अपघातात अनिल कांबळे (55), रा.-चहोली ता. हवेली जि. पुणे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोहन चव्हाण (42), धनराज मगर (42), विकास चव्हाण (18), नागनाथ कांबळे (35), निंगप्पा पातारे (28) सर्व राहणार पुणे विभाग हे पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी गंभीर दुखापत झालेल्या तिघांवर कळंबनी खेड उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यात आले. तर दोघे किरकोळ जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले आहेत. या अपघाताची माहिती समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र सर्णेकर, ठाणे अंमलदार सतीश कदम, पो. हा. नितेश कोंढाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविले. यासह कशेडी पोलीस मदत केंद्राचे पीएसआय गीमवणेकर, हेड कॉ. माजलकर, सोडमीस, चाटे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले व वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास ठाणे अंमलदार सतीश कदम हे करीत आहेत.

Exit mobile version