| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि.10) खोपोलीजवळ भीषण अपघात झाला. पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर अपघात झाला आहे.
ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटलं आणि ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, ओमनी कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले आहेत. तर या अपघातात ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. तसेच, ट्रकमधील 2 जण जखमी झाले आहेत. ट्रकची धडक ज्या टेम्पोला बसली, त्यातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. असे अपघातात एकूण 8 जण जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू करुन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले. तसेच, अपघातग्रस्त वाहने एक्सप्रेसवे वरुन हटवून वाहतूकही सुरळीत करण्यात आली आहे.