। मुंबई । वृत्तसंस्था ।
वांद्रे वरळी सी लिंकवर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. 2.53 वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. वांद्रे वरळी सी लिंकवर दोन वाहनांचा आधीच अपघात झाला होता. या अपघातातील जखमींना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उभी असल्याचं दिसून आलं. त्या रुग्णवाहिकेमागे अन्य दोन वाहनंही उभी होती. तर पुढे आणखी एक कार होती.
त्याच वेळी एका भरधाव कार सी लिंकवर उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगेत घुसली. ही जबर इतकी धडक होती की कार एका जागेवरुन उडून पुढपर्यंत फेकली गेली. एका अपघातातून वाचलेल्या रुग्णांना मृत्यूने पुन्हा एकदा गाठल्याची दुर्दैवी घटना दसऱ्याच्या दिवशी पहाटे घडली. या अपघाताची थरकाप उडवणारी दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
या भीषण अपघातामध्ये 5 जणांवर काळाने घाला घातलाय. तसेच 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
एक मारुती सुझुकीची बलिनो कार, सफेद रंगाची आणखी एक कार, रुग्णवाहिका, ह्युंदाई क्रेटा आणि अन्य एक वाहन या दुर्दैवी घटनेत अपघातग्रस्त झाले. सर्व वाहनांची अपघातानंतर झालेली स्थिती पाहून, हा अपघात किती भयंकर आणि जबर होता, याची कल्पना करता येऊ शकेल.