दिघी-वडवली रस्त्यावर भीषण अपघात; दोघेजण ठार

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी-बोर्लीपंचतन या मार्गावर बुधवारी (दि.29) रात्री 9 च्या सुमारास झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. वडवली व वेळास दरम्यान पेट्रोलपंपासमोर ही दुर्घटना घडली.

वडवली गावातील आतिश महेश नाक्ती (वय-30) हे मोटरसायकलवरून जात होते. त्यांनी बोर्लीच्या दिशेने चालत निघालेल्या इकबाल शरफुद्दिन गझगे (वय-55) रा. गोंडघर यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत दोघेही गंभीर जखमी होऊन पडले. हा अपघात एवढा भीषण होता कि मोटार सायकलचा पुढचा भागाचा चक्काचूर झाला. या घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याकडून तातडीने घटनास्थळी भेट देत दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लगेचच प्राथमिक उपचारासाठी बोर्लीपंचतन येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. उपचारापूर्वीच आतिश महेश नाक्ती यांना मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

तर इकबाल शरफुद्दिन गझगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले, पण दुर्दैवाने काही अंतरावर वाटेत, पेण शहराजवळ इकबाल शरफुद्दिन गझगे यांनीही आपले प्राण सोडले. शवविच्छेदनासाठी इक्बाल शरफुद्दिन गझगे यांचा शव म्हसळा व अतिष महेश नाक्ती यांचा शव श्रीवर्धन रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाताचा पंचनामा करून अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या घटनेने वडवली व गोंडघर गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातामध्ये मृत्यू पावलेला वडवली अतिष नाक्ती हा 30 वर्षाचा हरहुन्नरी तरुण बांधकाम व्यवसायामध्ये काम करीत होता. त्याने नुकतेच आपले नवीन घर बांधून काही दिवसांपूर्वीच घरामध्ये प्रवेश केला होता. अतिष हा सामाजिक, क्रीडा, राजकारण यामध्ये नेहमीच पुढाकार घेत होता. त्याच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.

Exit mobile version