| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (दि.12) रोजी सायंकाळी साडेसात- रात्री आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. याठिकाणी एक टेम्पो लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. त्यावेळी मागून येणाऱ्या वाहनाने टेम्पोला धडक दिली. त्यामुळे हा टेम्पो दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील पोलादी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या. या लोखंडी सळ्या टेम्पोच्या मागच्या भागात बसलेल्या तरुण मुलांच्या शरीरात शिरल्या. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सात जण जखमी झाले होते. दरम्यान, उपचारावेळी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळ्याकडून नाशिकमध्ये उतरणाऱ्या रॅम्पच्या पुढे उड्डाणपुलावर हा अपघात घडला. सर्व मृत आणि जखमी पाथर्डी फाटा, सह्याद्रीनगर (सिडको) येथील आहेत. या टेम्पोत असणारा केवळ एकजण सुदैवाने या अपघातामधून बचावला.
या दुर्घटनेत मृत्यू झालेली मुलं ही सिडकोच्या सह्याद्रीनगर आणि अंबड परिसरातील रहिवाशी होती. बहुतांश जण कामगार कुटुंबातील होते. हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परत येत होता. टेम्पो नाशिकच्या सय्यद पिंपरी परिसरातील आल्यानंतर या टेम्पोतील विक्रांत ठाकूर हा तरुण खाली उतरला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत या टेम्पोचा भीषण अपघात झाला. अपघात घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरारी झाला. अतुल मंडलिक, चेतन पवार, दर्शन घरत, यश खरात, संतोष मंडलिक अशी मृत तरुणांची नावे आहेत. जखमींमध्ये प्रेम मोरे, सार्थक ऊर्फ लकी सोनवणे, राहुल साबळे, विद्यानंद कांबळे, समीर गवई, अरमान खान, अनुज घरटे, साई काळे, मकरंद आहेर, कृष्णा भगत, शुभम डंगरे, अभिषेक आदी 14 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर खासगी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंना सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा परिणाम उड्डाणपुलाखाली द्वारका चौकातही होऊन त्याठिकाणीही वाहतूक कोंडी झाली. एक ते दीड तास वाहतूक कोंडी होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.