। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई येथील पाम बीच रोडवर रविवारी (दि. 12) भीषण अपघात झाला. एका भरधाव कारच्या धडकेत दोन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
संस्कृती खोकले (22) आणि अंजली सुधाकर पांडे (19) अशी अपघातातील मृत मुलींची नावे आहेत. रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोघीही ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर बाईकवरून घराकडे जात होत्या. दरम्यान कोपरा पुलाजवळील सर्व्हिस रोडने पाम बीच रस्त्यावर आल्या असता ठाण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या स्कोडा कारने त्यांच्या दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच संस्कृतीचा मृत्यू झाला होता. तर, उपचारादरम्यान अंजलीचाही मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.