| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई परळ- दापोली एसटी बसला रविवारी (दि.12) पहाटे 5 वाजता म्हाप्रळ येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात गाडीतील 30 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सविस्तर वृत्त असे, दाभोळ येथून मुंबईकडे दाभोळ मुंबई एसटी गाडी मार्गस्थ झाली. वाटेत मंडणगड तालुक्यातील शेनाळे येथील देशमुख बागेच्या पुढे चिंचाळी धरणाजवळ गाडीचे चालक व्ही. एस. गाडे हे रस्त्याचे उजव्या बाजूने जात असताना गाडीचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्यानजीकच्या दरीत 15 फुट खोल दरीत कोसळली व घसरत जावून एका झाडाच्या व दगडाच्या आधारावर ही बस अडकल्याने खोल दरीत धरणाच्या पाण्यात पडून होणारा मोठा अनर्थ सुदैवाने टळला. यावेळी गाडीत चालक व वाहकास 41प्रवासी प्रवास करीत होते. झालेला प्रकार अतिशय गंभीर होता. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तरी गाडीतील 30 प्रवाशी मात्र जखमी झाले. या घटनेची माहीती कळताच शेनाळे गावातील ग्रामस्थ व अन्य व्यक्तीनी घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गाडीतून सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले. तसेच एसटीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्यासाठी पोहचलेल्या वाहनांमधुन दोरखंडाच्या मदतीने अपघातग्रस्त प्रवाशांना दरीतून वर रस्त्यावर आणण्यात आले. जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे प्रथमोपचाराकरिता पाठवण्यात आले.