खोपटा रस्त्यावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर

। उरण । वार्ताहर ।

भरधाव वेगातील एन.एम.एम.टी बसने खोपटा रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या दोन मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला धडक दिली. या अपघातात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. तर केशव ठाकूर हे गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नवीमुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खोपटा गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करुन भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची मागणी केली.

खोपटा-कोप्रोली-चिरनेर या प्रवासी नागरीकांच्या रस्त्यावर अवजड वाहनांची रेलचेल असल्याने सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार आमदार महेश बालदी यांनी नँशनल हायवे इंडिया अँथाँरिटीच्या माध्यमातून सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 3 कोटी 75 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, ठेकेदारांनी सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे सदर रस्त्यावर वारंवार अपघात होण्याची संख्या बळावली आहे. रस्त्यावरील साईट पट्यांचा तसेच खडबडीत रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील एन.एम.एम.टी बस चालकाने रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या दोन मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला जोरदार धडक दिली. ही घटना गुरुवारी (दि.8) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात दोन मोटारसायकल स्वारांना फरफडत नेल्याने निलेश शशिकांत म्हात्रे यांचा मृत्यू झाला आहे. तर, केशव ठाकूर हे गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नवीमुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एन.एम.एम.टी बसमधिल प्रवासी नागरीकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करुन भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची तसेच वारंवार होणाऱ्या अपघातात मयत, जखमी नागरिकांना भरपाई देण्याची मागणी केली.

Exit mobile version