मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

मुंबई–गोवा महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात आज पहाटे खासगी बसचा भीषण अपघात झाला. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात आज पहाटे साधारण चार वाजण्याच्या सुमारास खासगी बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट महामार्गाच्या कडेला असलेल्या एका विद्युत पोलवर जाऊन आदळली. या जोरदार धडकेत विद्युत पोल कोसळला आणि बस पुढे घसरत जाऊन थेट बाजारपेठेतील दुकानात घुसली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या भीषण अपघातात बसचा पुढील भाग पूर्णपणे विद्रूप झाला आहे. स्थानिक दुकानाचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने ही बस रिकामी होती. तसेच अपघाताची वेळ पहाटेची असल्याने बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती आणि रस्त्यावरील वाहतूकही कमी होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Exit mobile version