। रसायनी । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर वावंढळ हद्दीत कंटेनर, टेम्पो आणि स्कुटी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी (दि.13) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात स्कुटी चालकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या महितीनुसार, वावंढळ हद्दीत कंटेनर, टेम्पो आणि स्कुटी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पनवेल दिशेकडून ट्रेलर तीन लोखंडी क्वाईल घेऊन खोपोली दिशेकडे जात असताना मोकाट जनावरांना वाचवताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तोल जाऊन तो खोपोली- पनवेल मार्गावर येऊन खोपोली दिशेकडून पनवेल कडे गुड्डे बिस्कीटे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला मागच्या बाजूला जोरदार धडक दिल्याने टेम्पो आणि ट्रेलर दोन्ही पलटी झाले. त्याच ठिकाणी राशिद राजपूत खोपोली म्हाडा कॉलनी येथे राहणारा स्कुटी चालक त्याची स्कुटी उभी करून भ्रमणध्वनी वर बोलत असताना त्याला जोरदार धडक दिल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
ट्रेलर आणि टेम्पो ची एवढी भीषण टक्कर झाली की, त्या आवाजाने परिसरातील लोक अपघात ठिकाणी धावत आले, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड प्रथम पोहचून त्यांनी पोलीस आणि आयआरबी यांना माहिती दिली. उपस्थितांनी जखमी स्कुटी चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, दरम्यान टेम्पो चालक टेम्पो खाली अडकून पडला होता, त्याला सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान या दोन तासांच्या घटनेत आयआरबी या रस्ता देखभाल दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेला संपर्क साधून कुणीही दखल घेतली नाही, याचा संताप सुनील गायकवाड व निखिल मालुसरे यांनी व्यक्त केला. आयआरबी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी दोघांनी केली असून, ते फक्त टोल वसुली करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सद्या शेतीची कामे पूर्ण झालेली असल्याने मोकाट जनावरे सोडण्यात आली आहेत, ज्या मालकांची ही जनावरे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे संतप्त नागरिकांनी म्हटले आहे.
राशिद राजपूत याचा अतिरक्त स्त्रावाने मृत्यू झाला. कंटेनर मध्ये तीन अती वजनाच्या क्वाईल वाहून नेण्याचा परवाना आहे का? याच्यावर वाहतूक पोलीस कारवाई करतील का? या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अशा प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते क्रेन, हायवा बोलावून अपघातग्रस्त वाहने बाजूला करतात हा खर्च त्यांच्या अंगावर येतो. त्यामुळे आयआरबी यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जुन्या मुंबई- पुणे रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू
