| मुंबई | प्रतिनिधी |
दक्षिण मुंबईतील वरळी सी-लिंकवर मंगळवारी (दि.9) सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सागरी किनारा मार्ग आणि वरळी सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉईंटजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी काही पोलीस कर्मचारी व्हीआयपी बंदोबस्तासाठी तैनात होते. रस्त्यावरुन भरधाव वेगात जात असलेल्या एका कारने या पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. या अपघातात एका पोलीस हवालदाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव दत्तात्रय कुंभार असे आहे. ते वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गाडीच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने वोकहार्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरु आहे.







