| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायतीमधील नांगुर्ले गावातील अनिल देशमुख या तरुणावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हल्ला चढवला. ही घटना मंगळवारी (दि. 25) रोजी सकाळी घडली. या हल्ल्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील नांगुर्ले येथील रहिवासी अनिल देशमुख त्यांच्या चारचाकी वाहनामधून तिघर ते भिलवले मार्गे जात होते. प्रवास करीत असताना पाच ते सहा जणांच्या टोळक्याने अनिल देशमुख यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. अनिल देशमुख तिघर येथून भिलवले गावाकडे जात असताना त्यांच्यासमोर चारचाकी गाडी उभी राहिली. त्यानंतर त्या गाडीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी देशमुख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात हातावर, पायावर, डोक्यात आणि पाठीवर जबरी मारहाण केल्याने ते यामध्ये गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी अवस्थेत देशमुख यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे आता कर्जत पोलीस कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड करीत आहेत.