मांडवा सागरी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
नवखारहून मोरपाडा येथे जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या माजी सभापतींवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तो इसम जखमी झाला आहे. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई न केल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. मारहाण करणारी मंडळी दिलीप भोईर यांचे समर्थक असल्याचा दावा प्रकाश पाटील यांनी केला आहे. मात्र, मारण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
प्रकाश चंद्रसेन पाटील असे या पदाधिकार्याचे नाव असून गेल्या अनेक वर्षापासून ते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ता म्हणून काम करीत आहेत. अलिबाग पंचायत समितीचे ते माजी सभापती आहेत. सोमवारी रात्री रांजणखार डावली (नवखार) येथून ते त्यांच्या गाडीतून मोरापाडा येथे त्यांच्या घरी जात होते. रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टाकीच्या पुढे महेंद्र पाटील यांनी पिकअप गाडी आडवी टाकली. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. हा वाद विकोपाला पोहोचला. पिकअपमधून अन्य मंडळींनी येऊन प्रकाश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांना शिवीगाळी करून धक्काबुक्की करण्याबरोबरच लोखंडी रॉडने गंभीर दुखापत केली.
याप्रकरणी फुफादेवी पाडा येथील महेंद्र पाटील, रांजणखारमधील सोपान पाटील, श्रीधर पाटील, कांचना पाटील, नागेश पाटील, सुधा पाटील दमयंती पाटील या सात जणांविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटूनही मांडवा पोलिसांनी मारेकर्यांविरोधात ठोस कारवाई केली नसल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.