अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून, तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी (दि.1) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे हे नेहमीप्रमाणे चार फाटा येथील ठाकरे उपाहारगृह येथे चहा पिण्यास गेले होते. तेथून परतताना कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकाने हात करून त्यांना थांबवले. वाटले की, कोणी पत्ता विचारतोय, म्हणून ते थांबले. मात्र, काही कळायच्या आतच चार-पाच अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी हल्लेखोरांनी हातात फायटर, लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे घेऊन कुडेकर आणि त्यांच्या मित्रावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात कुडेकर व त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली. मित्राने धाडसाने मध्ये पडून कुडेकर यांचे प्राण वाचवले. काही वेळातच घटनास्थळी जमाव जमा झाल्याने हल्लेखोरांनी सिल्व्हर रंगाच्या वॅगनर गाडीतून पलायन केले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, पायाला काही फॅक्चर आहे काय? हे तपासणीअंती निश्चित होणार आहे.
दरम्यान, कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरन नवले हे करीत आहेत.







