जेएनपीए नॅशनल हायवे प्रशासनचे दुर्लक्ष
| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीए पोर्टची ट्रॅफिक कमी करण्यासाठी नॅशनल हायवे ॲथॉरिटीने ठेकेदाराच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून गव्हाण फाटा ते नवघर फाटा असा रस्ता तयार करण्यात आला. प्रवासी नागरिकांसाठी सेवा रस्ता ही तयार करण्यात आला. मात्र, या सेवा रस्त्याचा ताबा अवजड वाहणांनी घेतला असून, तेथे चिखलाचा राडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांच्या छोट्या वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
जेएनपीए पोर्ट आणि त्यावर आधारीत आणखी पाच पोर्ट निर्माण करण्यात आले आहे. या पाच पोर्टची वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेएनपीए पळस्पे मार्ग, बेलापूर नवघर मार्ग नॅशनल हायवेने सहापदरी मार्ग बनविले आहे. तसेच सदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाण पुलाची निर्मिती केली. त्या अनुषंगाने या परिसरातील गावातील नागरिकांसाठी सेवा रस्ता ही तयार करण्यात आला आहे. मात्र, या सेवा रस्त्याचा ताबा अवजड वाहणांनी घेतला आहे. दास्तान फाटापासून ते गव्हाण फाटापर्यंत संपूर्ण सेवा रस्त्यावर अवजड वाहने पार्क केलेली पाहायला मिळत आहेत. या अवजड वाहनांमुळे या सेवा रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाचा राडा निर्माण झाला आहे. यामुळे मात्र प्रवाशांच्या छोट्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित प्रशासनाने सदर मार्गावरील अवजड वाहनांची होणारी पार्किंग दूर करण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्डे, चिखल दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.






