| माथेरान | मुकुंद रांजाणे |
एक गाव बारा भानगडी प्रमाणे आजही माथेरानची सद्यपरिस्थिती कायमच आहे. एवढ्याशा लहान गावात सुध्दा दिल्लीला लाजवेल असे इथल्या गल्लीतील राजकारण युवा पिढी अनुभवत आहे. समस्या मग ती कुठल्याही स्वरूपाची असो इथली राजकीय मंडळी केवळ कामाचे श्रेय आपल्याच पक्षाला मिळायला हवे यासाठी अट्टाहास करतांना दिसत आहेत. श्रेयवादासाठी नातीगोती देशोधडीला लाऊन केवळ आपल्याला नावलौकिक मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून येथे लढाई सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील खेडोपाडी प्रगतीच्या शिखरावर उत्तुंग भरारी घेत असताना हे छोटेसे गाव अजूनही खेकडा प्रवृत्ती सोडण्यास तयार नाही हे या गावासाठी दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
माथेरानला नैसर्गिक अलौकिक ठेवा लाभलेला असून, परिसरातील लोकांसाठी हे गाव दुभती गाय आहे. त्यामुळे परिसरातील बहुतांश सर्वच क्षेत्रातील लोक इथे नियमितपणे येऊन मुबलक पैसा कमावून जातात आणि त्यांना इथली काही राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी परिस्थितीनुसार गुमान आर्थिक पुरवठा देखील करीत असतात. मध्यमवर्गीय इथली रिकामी डोकी फक्त राजकारणात गुंग असतात. रिकामे डोके सैतानाच घर या उक्तीप्रमाणे वागत सुद्धा आहेत. अनेक समस्या कायमस्वरूपी असताना अमूक कामे आमच्याच कारकिर्दीत झाली आहेत याचा आव आणून भविष्यातील निवडणूक आम्हीच जिंकायला हवी यासाठी प्रत्येकाचा खटाटोप आजही सुरूच आहे.
ज्यांना या गावाविषयी काडीचेही सोयरसुतक नाही अशांना इथल्या राजकारण्यांनी स्वत:हून राजकारणात आणलेले असुन त्यांची नावे सुद्धा केवळ मतांसाठी मतदार यादीत समाविष्ट केलेली आहेत. सध्या नाही परंतु भविष्यात हेच परिसरातील वाढलेले लोंढे स्थानिक भावी पिढीला डोकेदुखी ठरणार आहे याची पुसटशी कल्पना देखील राजकारण्यांना नाही की जाणूनबुजून मतांच्या हव्यासापोटी मूग गिळून गप्प बसले आहेत ही सुद्धा लाजिरवाणी बाब असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात, आणि राजकारणात सुध्दा स्थानिकांनी परिसरातील लोकांनाच जवळ केल्यामुळे आगामी काळ खूपच धोकादायक आहे. भारतात व्यवसाय कुणीही करू शकतो, परंतु गावाची सर्वच पाळेमुळे दाखविण्यात आल्याने आणि परिसरातील लोकांना डोक्यावर घेतल्याने भविष्यात स्थानिकांना येथुन काढता पाय घ्यावा लागणार आहे, यात वादच नाही. असे ही संतप्तपणे काही युवा आणि ज्येष्ठ मंडळी संतप्तपणे बोलत आहेत.
माथेरान अबाधित राखायचे असेल तर स्थानिकांनी एकत्रित राहुन गावाला विकासाच्या दिशेने न्यायलाच हवे. राजकारण ठराविक वेळेपुरता असते याचा विसर इथल्या मंडळींना पडल्यामुळे हे गाव विकासापासून वंचित राहिलेले आहे. अतिक्रमणे असोत किंवा ज्यांच्यामुळे गावाला विद्रुपीकरणाचे रूप धारण केले जात आहे. याबाबत आवाज उठवला तर अशांची पाठराखण केली जात आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात काय घबाड आहे की त्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकीय खेळी खेळली जात आहे. केवळ निष्कलंक मंडळी सभागृहात जायला नकोत त्यासाठी ज्यांना राजकीय गंध सुध्दा नाही अशांना गोळा करून शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात झाली आहे.
या एकाच पर्यटनस्थळावर तालुक्यातील अनेकांना आपली उपजीविका भागवावी लागत आहे. आणि ज्यांनी पिढ्यानपिढ्या येथे वास्तव्यास राहुन जमा नावे शुन्य अशीच भयावह परिस्थिती राजकारण्यांनी निर्माण केली आहे. आजही अनेक कामे प्रलंबीत आहेत ज्यामुळे गाव विकासाच्या दिशेने धावू शकेल इथे आर्थिक उत्क्रांती घडु शकते त्यासाठी कुणीही सहसा धाडस करीत नाही राजकीय मंडळी ध्येयवादी नसून श्रेयवादी बनली आहेत. जो तो पक्षाच्या इभ्रतीसाठी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी झटत आहे. त्यातच मतांचे राजकारण आणि श्रेयवादामुळे हे रायगड जिल्ह्यातील टुमदार पर्यटनस्थळ आजही इतर स्थळांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहे. यासाठी निदान आतातरी शहाणे होऊन गावाची समयसुचकता लक्षात घेत विकासासाठी खडतर आव्हाने पेलून यशस्वीपणे वाटचाल करावी, असे तरुण बोलत आहेत.







