आरोपीस सहा वर्षांची सक्तमजुरी
| माणगाव | प्रतिनिधी |
अल्पवयीन मुलीवर काचेच्या फुटलेल्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस सहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा निर्णय महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर संदेश देणारा ठरला आहे. 28 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेडकर कॉलेजसमोरील पुलावर ही घटना घडली होती. सारळ उर्फ सॅरल सुनील शिंदे (रा. दहिवाड, ता. महाड) याने अल्पवयीन मुलीवर संबंध ठेवण्याचा दबाव टाकत वारंवार फोन करून त्रास दिला होता. घटनेच्या दिवशी त्याने मुलीचा रस्ता अडवून धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने फुटलेल्या काचेच्या बाटलीने मानेवर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात खून करण्याचा प्रयत्न, विनयभंग, धमकी तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांनी 4 मार्च रोजी निकाल देताना आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अन्वये 6 वर्षे सक्तमजुरी व दंड, तसेच इतर कलमांखाली स्वतंत्र शिक्षा व दंड ठोठावला.
