| पनवेल | वार्ताहर |
‘मुंबई ते म्हसवड’ या रुटवर तू ट्रॅव्हल्स का सुरू केल्या, असे म्हणत एकाने ‘विजयालक्ष्मी ट्रॅव्हल्स’ या नावाने खासगी बसेस चालविणाऱ्या मालकाला मारहाण करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात 7 ते 8 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत किसन सरगर (24), रा. कामोठे असे जखमी झालेल्या खासगी बस मालकाचे नाव आहे. त्यांच्यावर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिकेत सरगर यांच्या स्वत: च्या मालकीच्या 15 खासगी बसेस आहेत. या 15 पैकी काही बसेस या मुंबई ते कराड, कराड ते हैद्राबाद आणि मुंबई ते जत या मार्गावर दररोज चालतात. सरगर यांनी 19 डिसेंबरपासून त्यांनी एक बस मुंबई ते म्हसवड या मार्गावर सुरू केली. या मार्गावर ‘ट्रॅव्हल्स का सुरू केली?’ असे म्हणत गोलू नावाच्या सराईत गुंडासह 7-8 जणांनी त्यांना मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सलगर यांना उपचारासाठी दाखल केले.







