पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला

| पॅलेस्टाईन | वृत्तसंस्था |
गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध चालू आहे. गाझा पट्टीत सर्वत्र विध्वंस सुरू आहे. अशातच वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून महमूद अब्बास थोडक्यात बचावले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी अब्बास यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. परंतु, त्यांच्या ताफ्यातील संरक्षण अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांवर गोळीबार करून हा हल्ला परतवून लावला. तसेच अब्बास यांचे प्राण वाचवले.

भर रस्त्यात हल्लेखोर आणि संरक्षण दलातील जवानांमध्ये बराच वेळ ही चकमक सुरू होती. जवानांच्या तीव्र प्रतिकारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी संरक्षण अस्थापनांमध्ये घुसून हा हल्ला करण्यात आला होता. ‌‘सन्स ऑफ अबू जंदल’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सन्स ऑफ अबू जंदल संघटनेने पॅलेस्टिनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांना इस्रायलवर कारवाई करण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. परंतु, अब्बास यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असं म्हणत सन्स ऑफ अबू जंदल संघटनेने महमूद अब्बास यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. परंतु, संरक्षण दलातील जवानांमुळे महबूद अब्बास थोडक्यात बचावले.

इस्रायल आणि हमासच्या युद्धात अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. याच मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी काळजी व्यक्त करत मोठं विधान केलं आहे. गाझा लहान मुलांसाठी स्मशान बनत आहे, असं स्पष्ट मत अँटोनियो गुट्रेस यांनी व्यक्त केलं आहे.

Exit mobile version