अवेटी येथील महिलेवर जीवघेणा हल्ला

पोयनाड पोलिसांकडून कारवाईची टाळाटाळ

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील अवेटी येथील एका महिलेवर दोन जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच ही घटना घडली असून याबाबत मात्र पोयनाड पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप जखमी महिलेने केला आहे. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्‍न महिला वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

प्राजक्ता ठाकूर असे या जखमी महिलेचे नाव आहे. गावातील एका कुटूंबियासमवेत या महिलेचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. सोमवारी (दि.19) दुपारी प्राजक्ता ठाकूर या घरात असताना काही महिलांनी घरात घुसून त्यांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर गावातील दोन जणांनी या महिलेच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जबर हल्ला केला. तसेच, या बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये प्राजक्ता ठाकूर या गंभीर जखमी झाल्या आहेत. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

प्राजक्ता ठाकूर या जखमी अवस्थेतच महिला पोयनाड पोलीस ठाण्यात न्यायासाठी गेल्या होत्या. परंतु, तेथील पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. तसेच, मारेकर्‍यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच एका महिलेवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याबाबत पोलिसांकडूनच संरक्षण मिळत नसल्याची खंत ठाकूर यांनी व्यक्त केली. ही घटना घडून अनेक तास उलटून गेले. परंतु, पोलिसांनी अद्यापही मारेकर्‍यांविरोेधात गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप प्राजक्ता ठाकूर यांनी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यांमध्ये दामिनी पथकाच्या ताब्यात दुचाकी देण्यात आल्या आहेत. महिलांना सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातच अवेटी येथील महिलेवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोयनाड पोलिसांनी महिला सुरक्षेच्यादृष्टीने काय भूमिका घेतली, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात जखमी महिला उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. तेथील पोलिसांनी पंचनामा करून तो अहवाल पोलीस ठाण्यात पाठविला आहे. महिलेच्या सुरक्षेच्यादृष्टीने विचार करून तात्काळ रात्री गुन्हा दाखल केला आहे.

– संतोष दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोयनाड

Exit mobile version