अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बहिणीच्या प्रियकराला भावाकडून हॉकीस्टीकने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. बहिण तिच्या प्रियकरासोबत वरसोली येथील समुद्रकिनारी बोलत असल्याचा राग धरून प्रियकरावर भावाने जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार शुक्रवारी घडला असून, याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर आणि प्रेयसी असे दोघेजण अलिबागजवळील वरसोली येथील समुद्रकिनारी कारमध्ये बसून संवाद साधत होते. दरम्यान तरुणीचा भाऊ त्या परिसरात आला असताना त्याने दोघांना पाहिले. याचा राग धरून त्याने हॉकी स्टीकने प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये तो जखमी झाला. त्याला अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत ठाकूर करीत आहेत.





