1 हजार 400 विमानांमध्ये जीईचे इंजिन
| पुणे | प्रतिनिधी |
जीई एरोस्पेस कंपनीच्या चाकणमधील प्रकल्पातून विमान इंजिनांसाठी महत्त्वाच्या सुट्या भागांची निर्मिती केली जात आहे. या भागांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या इंजिनचा पुरवठा जगभरातील विमान कंपन्यांना केला जात आहे. या सर्व कामांचे नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) उपयोग करण्यात येत असल्याची माहिती जीई एरोस्पेस कंपनीच्या जागतिक निर्मिती प्रक्रिया व पुरवठा साखळीचे कार्यकारी संचालक अमोल नागर यांनी नुकतीच दिली.
जीईचा पुण्यातील चाकणमधील प्रकल्प 2014 मध्ये सुरू झाला. त्याच्या दशकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी कंपनीने या प्रकल्पात 240 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतात सेवेत असलेल्या 1 हजार 400 विमानांमध्ये जीईची इंजिन वापरली जातात. जगातील प्रमुख विमान कंपन्यांकडून जीईच्या इंजिनचा वापर केला जात आहे. विमानांच्या इंजिनना मागणी वाढल्यास सुट्या भागांचीही मागणी वाढली आहे. यासाठी कंपनीने चाकणमधील प्रकल्पाच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करत आहे. याबाबत नागर म्हणाले, पुण्यातील प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सुट्या भागांचा वापर लीप, जीईएनएक्स आणि जीई9एक्स या विमान इंजिनसाठी केला जातो. जवळपास हजाराहून अधिक सुट्या भागांचा वापर इथे केला जातो. एआयच्या माध्यमातून प्रंचड डेटाचे विश्लेषण सोपे झाल्याने, भविष्यातील कामकाजाचे नियोजन सुलभ झाले आहे.
केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अभियांत्रिकी पदविकेच्या विद्यार्थ्यांनाही कौशल्य विकासाचे धडे दिले जात आहेत. त्यासाठी विविध महाविद्यालयांशी भागीदारी करण्यात आली आहे. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना विमाननिर्मिती क्षेत्राचे प्रशिक्षण दिल्याची माहिती जीई एरोस्पेसच्या चाकण प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित सिंह यांनी दिली. विद्येचे माहेरघर म्हणून नेहमीच पुण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. परंतु, आता सर्वाधिक विमानांना इंजिन बसविण्यातही पुणे आघाडीवर येत असल्याने जगात वेगळी ओळख निर्माण होत आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीसुद्धा होत असल्याचे बोलले जात आहे.






