। धाराशिव । प्रतिनिधी ।
मुलीच्या उच्च शिक्षणाचा खर्च करण्यासाठी पैसे नसल्याने धाराशिव तालुक्यातील डकवाडी येथील शेतकरी अमोल नवनाथ डक या शेतकऱ्याने राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली.मिळालेल्या माहितीनुसार अमोल डक यांच्या मुलीची बारावी झाली होती व तिला सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. मुलीला इंजिनीरिंगला प्रवेश घ्यायचा होता परंतु अमोल डक यांच्यावर आधीच बँकेचे कर्ज होते. त्यात पुन्हा मुलीला बाहेर ठेवून शिक्षणाचा खर्च कसा पेलणार, या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या नोंदीत आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी 7 वाजता कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी ढोकी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.अमोल डक हे शेती कसून त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवीत होते.पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व थकलेले वृद्ध आई-वडील, असा परिवार त्यांच्यामागे राहिला आहे. अमोल हे शेती करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते.
सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वांची जेवणे झाल्यानंतर ते 10:30 वाजता झोपण्यासाठी गेले. घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर त्यांनी साडीच्या साहाय्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर 7 वाजता हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. त्यांचे नातेवाईक विनोद डक यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ढोकी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.







