| धाराशिव | प्रतिनिधी |
धाराशिव जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पारधी समाजाच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत चौघांचा मृत्यू झाला आहे. शेतात पाणी देण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली असून, जीव जाईपर्यंत मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून यात 3 पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे.
मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 10 आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धाराशिवमधील वाशी तालुक्यातील बावी पेढीवरील ही घटना असून मध्यरात्री शेतात पाणी देण्याच्या वादातून दोन्ही गटात प्रचंड मारहाण झाली. या हाणामारीत जीव जाईपर्यंत एकमेकांना मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास येरमाळा पोलीस करीत आहेत.