| कर्जत | प्रतिनिधी |
सायबर फसवणुकीतून मिळणारी बेकायदेशीर रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खाते उघडून ती रक्कम अन्यत्र वळती करण्याच्या प्रकरणी कर्जत पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमत करून ‘म्यूल बँक खाते’ उघडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 13 मार्च 2024 ते दि. 17 मार्च 2026 या कालावधीत कर्जत येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एका खात्याचा सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम वळती करण्यासाठी वापर करण्यात आला. आरोपी क्रमांक एक हा दहिवली, कर्जत येथील रहिवासी असून आरोपी क्रमांक दोन हा धनकवडी, कात्रज रोड, पुणे येथील रहिवासी आहे. दोघांनी संगनमत करून खाते उघडले आणि विविध राज्यांतील नागरिकांची सायबर फसवणूक करून मिळालेली रक्कम या खात्यात स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी वळती करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी कमिशन घेत स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.







