वाहतूक पोलिसांच्या नियुक्तीची मागणी
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल सेक्टर 2 येथील जय अंबे माता मंदिरासमोरील रस्त्यावर शाळांच्या व्हॅन दोन्ही बाजूंनी बेकायदेशीरपणे उभ्या राहात असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. विशेषतः दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही समस्या अधिक तीव्र होत असून, नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या परिसरातील डीएव्ही स्कूल आणि शांतिनिकेतन शाळा या दोन्ही शाळांची सुट्टी आणि प्रवेशाची वेळ जवळपास एकाच वेळी असल्यामुळे मोठ्या संख्येने शाळेच्या व्हॅन आणि इतर वाहने एकाच वेळी रस्त्यावर येतात. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व्हॅन उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि काही काळासाठी संपूर्ण रस्ता ठप्प होतो. या वाहतूक कोंडीचा फटका स्थानिक रहिवासी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर वाहनचालकांना दररोज बसत आहे. त्यामुळे दोन्ही शाळांच्या सुट्टीचा आणि भरण्याच्या वेळेत किमान 15 मिनिटांचा फरक ठेवावा, तसेच शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी संबंधित प्रशासन आणि वाहतूक विभागाकडे केली आहे.
नागरिकांच्या मते, वेळेत योग्य नियोजन आणि वाहतूक नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास या परिसरातील दररोजची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.







