घाईघाईत कार्यक्रम उरकल्याने शेतकरी, लोकप्रतिनिधी नाराज
| चिरनेर | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने खोपटे प्राथमिक शाळेत मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व मत्स्यबीज वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उरण तालुक्यातील सुमारे 300 शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वाटप करण्यात आले.
तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. भरत यादव, रवींद्र बोंद्रे आणि तालुका मत्स्य अधिकारी सुरेश बाऊलगावे यांनी शेतकऱ्यांना मत्स्यशेतीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी शेतीसोबत मत्स्यशेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, असे सांगत खारे व गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनावरून शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी कृषी विभागाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाची माहिती शेतकऱ्यांना अवघी एक दिवस आधी, तर लोकप्रतिनिधींना रात्री उशिरा देण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यातच तज्ज्ञांचे प्रशिक्षण अवघ्या दहा मिनिटांत उरकल्याने उपसभापती परेश ठाकूर आणि पंचायत समिती सदस्या कविता रूपेश पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतकऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणच घाईघाईत उरकायचे असेल तर त्याचा नेमका फायदा काय, असा सवाल उपस्थित करत पुन्हा स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना कविता पाटील यांनी कृषी विभागाला केली.






