नागरी सुविधांचा बोजवारा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहराला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी इमारती उभ्या राहात असताना त्याप्रमाणात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायतीला अपयश येत असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आराठी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर निवासी इमारती उभ्या राहिल्या असून, हजारो नागरिक या परिसरात वास्तव्यास आले आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि कचरा व्यवस्थापनाची पुरेशी व्यवस्था आहे का, याचा विचार बांधकामांना परवानगी देताना करण्यात आला का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
श्रीवर्धन-म्हसळा-गोरेगाव हा प्रमुख मार्ग आराठी ग्रामपंचायत हद्दीतून जातो. या मार्गालगत नव्या इमारतींची बांधकामे झाली असून, काही ठिकाणी रस्त्यापासून अत्यल्प अंतरावर बांधकामे करण्यात आल्याचे चित्र आहे. श्रीवर्धन-दिघी मार्गावरील आराठी ग्रामपंचायत हद्दीतही मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांवर होणारा ताण लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, आराठी परिसरातील विविध भागांत ओला-सुका कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या आणि इतर कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याने सर्वत्र अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने दुर्गंधी तसेच डास आणि रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आराठी ग्रामपंचायत हद्दीत श्रीवर्धन बसस्थानक परिसरापासून मेटकर्णी, आराठी, विद्यानगर आदी भागांचा समावेश होतो. या परिसरात वाढत्या नागरीकरणाबरोबरच विविध ठिकाणी दुकानगाळे उभारून ते भाड्याने देण्याचे प्रकारही सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. याबाबत संबंधित जागांची मालकी, बांधकाम परवानग्या आणि नियमांचे पालन याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आराठी ग्रामपंचायतीचा कारभार आणि बांधकामांना देण्यात आलेल्या परवानग्यांची चौकशी करावी, तसेच कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







