। मुंबई । प्रतिनिधी ।
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणा संबंधित चर्चा करण्यासाठी विरोधकांच्या शिष्टमंडळातील नेत्यांनी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सोमवारी (दि.06) भेट घेतली. या भेटीवेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपालांना निवेदन दिले. ज्यानंतर या नेत्यांनी राजभवानाबाहेर येऊन प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सरकारला या प्रकरणी उशिरा शहाणपण सूचत असून सरकारकडून वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
यावेळी, आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हे जे जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे, ते पहिले थांबले पाहिजे. कारण संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आम्ही त्यांची जात तपासली नाही. आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्याविरोधात बोललो. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आम्ही याविषयी बोललो. मरणाला गेला, त्याला मारणार्याचे उदात्तीकरण झाले तर महाराष्ट्राचे वाटोळे होईल, हे आम्ही आधीच सांगितले होते. मेलेल्या जात आहे का? या घटनेत माणुसकीची हत्या झाली. संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाची घृणा पूर्ण महाराष्ट्रात आहे. यामध्ये कोणती जात आणायची. मी दुसर्याही समाजाला सांगतो की, तुम्ही एखाद्या खुन्याचे उदात्तीकरण कसले करता? त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे कारण हे होते की याआधी जितके काही गुन्हे झाले आहेत, ते सर्व उघडकीस आले पाहिजेत, असे आव्हाडांकडून यावेळी सांगण्यात आले.
तर, बीडमधील राखेचे राजकारण, तिथल्या अवैध धंद्यांचे राजकारण, तिथे आजपर्यंत झालेल्या सर्व हत्या, त्या हत्येतील आरोपी या सर्वांचे न्यायालयीन चौकशी अंतर्गत चौकशी झाली पाहिजे. परंतु, आपण सर्वांनी जातीपातीमध्ये स्वतःला इतके कोंडून घेतले आहे की, या चौकशीची वाट लागेल, अशी चिंता आमदार आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. तसेच, सोमनाथ सूर्यवंशी यांची परभणीत झालेली हत्या ही सुद्धा तितकीच गंभीर आहे. त्यामुळे हे प्रकरण झाकू नका. कारण, असे काही केले तर यापुढे पोलिसीराज येईल.
तसेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात जास्त कोणाची चूक असेल तर पोलीस अधिकारी प्रशांत महाजन यांची आहे. जे मी विधानसभेत सुद्धा सांगितले. त्यावेळी सरकारने त्या अधिकार्याची बाजू घेतली. त्याच महाजनची रविवारी बदली करावी लागली. महाजनने जर का अशोक सोनावणेची अॅट्रॉसिटी घेतली असती तर हा प्रकार झाला नसता. हाच महाजन बापू आंधळे प्रकरणात चौकशी अधिकारी होता, पण त्यांनी त्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव वाल्मीक अण्णा असे लिहिले. तोच महाजन केजला अधिकारी म्हणून गेला. तिथेही त्या महाजन या अधिकार्याने एका प्रकरणात तक्रार लिहून घेतली नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाचे मूळ महाजन हा पोलीस अधिकारी आहे. पण सरकारला उशीरा शहाणपण सूचत आहे. या सरकारकडून वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.