| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी गावच्या हद्दीत रविवारी (दि.5) दुपारी 1 च्या सुमारास कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. रमलाबेन आरीवाला व अमृतलाल घिवाला अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रने गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील कार चालकाचे नियंत्रण सुटले. कारचा वेग अधिक असल्याने अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या कडेला खाली उतरून दोन ते तीन वेळा उलटली व दूरवर खड्ड्यात कोसळली. राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी नजीक दुपारी एक वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातात कारच्या मागील सीटवर बसलेल्या रमलाबेन आरिवाला, अमृतलाल घिवाला या दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारचालक व त्यांच्या बाजूला कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेली पत्नी या दोघांनीही सीट बेल्ट लावले असल्याने या अपघातात दोघांचे प्राण वाचले आहेत. मात्र पती-पत्नी दोघेही या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.