जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी कचर्याचा ढिगारा
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
वाढत्या कचर्याबरोबरच प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती केली. ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे जिल्ह्यात कारभार चालला. परंतु, ग्रामीण भागात आजही ठिकठिकाणी कचर्याचा ढिगारा पडून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात 809 ग्रामपंचायती असून, दोन हजारांहून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार इतकी आहे. ग्रामीण भागांचा विकास हा जिल्हा परिषदेमार्फत केला जातो. ग्रामपंचायतींकडून आलेल्या योजनांची पडताळणी करून जिल्हा परिषदेमार्फत योजनांची अंमलबजावणी केली जाते. ग्रामीण भागात घनकचर्याचा प्रश्न हा गंभीर होत चालला आहे. काहीजण शेतांसह रस्त्याच्या दुतर्फा, नदी, नाल्यामध्ये कचरा टाकून देतात. त्यामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची भीती निर्माण होत असताना पर्यावरणाचा समतोलही बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता मिशन विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत जिल्ह्यामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याबरोबरच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. प्लास्टिकसह अन्य कचर्याची विल्हेवाट लावण्याबाबत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन केले जाते. कचर्याबाबत जनजागृती करण्यासाठी फलकदेखील लावले जातात. ग्रामीण भागातील नागरिकांना कचर्याचे व्यवस्थापन करण्याची सवय राहवी, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत कंपोस्ट खड्डे तयार करण्याबाबत ग्रामपंचायतींना आवाहन केले. त्या आवाहनाला ग्रामपंचायतींकडून प्रतिसाद मिळाला. कंपोस्ट खड्डे तयार करण्यासाठी स्वच्छ भारत अभियनामार्फत 70 टक्के व ग्रामपंचायतींच्या 15 वित्त आयोगातून 30 टक्के असा निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कंपोस्ट खड्डे तयार करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फासह काही मोकळ्या जागेतही कंपोस्ट खड्डे तथा पीट बांधण्यात आले. आठ ते दहा फूट खोल व सहा फूट लांब, चार फूट लांब अशा या कंपोस्ट खड्ड्याची आखणी होती. परंतु, या कंपोस्ट खड्ड्यातील कचर्याची विल्हेवाट लावण्यास ग्रामपंचायती उदासीन ठरल्याने त्याठिकाणी कचर्याचा ढिगारा तयार झाला.
आता मात्र जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील गावांच्या वेशीवर, रस्त्याच्या दुतर्फा प्लास्टिक व इतर कचरा अस्ताव्यस्त पडून आहे. रस्त्यावरून येणार्या प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. या कचर्याच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे कुत्र्यांचा उपद्रवही वाढला आहे. कुत्र्यांकडून हल्ला होण्याबरोबरच दुचाकीचा अपघातही होत असल्याची भीती निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर, गावांच्या वेशीवर कचर्यांचा ढिगारा दिसून येत आहे. या कचर्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कंपोस्ट खड्ड्याच्या उपक्रमाला धाब्यावर बसवत अनेक ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम गावपातळीवर होत आहे. याकडे जिल्हा परिषद विभाग गांभीर्याने लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागात कचर्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना केल्या जातील. स्वच्छतेवर भर देणे‘ ही काळाची गरज आहे.
भारत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद