मुलाच्या हत्येसाठी 75 लाखांची सुपारी

वडील उठले लेकाच्या जीवावर

| पुणे | वृत्तसंस्था |

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तुल रोखून गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. आरोपीचे नाव ऐकून सगळ्यांना एकच धक्का बसला आहे. वडिलांनीच मुलाच्या हत्येची सुपारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील आरोपींना अटक केली आहे. 

आरोपी वडील दिनेशचंद्र हे त्यांचा मुलगा धीरज अरगडे याच्या मनमानी वागणुकीमुळे नाराज होते. त्याच्या या वागण्याच्या त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत होता. एवढंच नव्हे तर कौटुंबिक कारण आणि मालमत्तेच्या वादामुळेही पिता-पुत्राच्या नात्यात तणाव वाढला होता.

16 एप्रिल रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास ते जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स बिल्डिंगजवळ असताना हा हल्ला झाला. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी धीरज यांच्यावर गोळीबार केला पण ती गोळी पिस्तुलामध्येच अडकली आणि धीरज यांचा जीव वाचला. हत्येच्या प्रयत्नानंतर फिर्यादी धीरज अरगडे यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीमने कसून तपास सुरू केला. त्यादरम्यान पोलिसांनी परिसरातील आणि बिल्डींगजवळील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच धीरज अरगडे आणि सर्व नातेवाईकांची कसून चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात आली. धीरज आणि त्यांचे वडील दिनेशचंद्र अरगडे यांच्याच कौटुंबिक कारण आणि संपत्तीच्या मुद्यावरून वाद सुरू होते, याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यासंदर्भात अधिक तपास केल्यावर धीरज यांच्या हल्ल्यामागे त्यांच्या वडीलांचाच हात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.

हत्या करण्यासाठी त्यांचे वडील दिनेशचंद्र यांनी हल्लेखोरांना तब्बल 75 लाख रुपयांची सुपारी दिली. याप्रकरणी वडील दिनेशचंद्र अरगडे यांच्यासह प्रशांत घाडगे, अशोक ठोंबरे, प्रवीण कुडले, योगेश जाधव, चेतन पोकळे यांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version